रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील आगामी नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुका पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून राजकारणात सक्रिय नसलेले माजी आमदार शिरीष चौधरी पुन्हा एकदा पूर्णपणे सक्रिय मोडवर आल्याचे चित्र आहे. त्यांच्या या पुनरागमनामुळे विरोधकांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली असून, स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतरच त्यांची वाढती सक्रियता हे त्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
शनिवारी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यालयात भेट दिली. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीने अमळनेर शहरात राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे.
माजी आमदार शिरीष चौधरी हे नेहमीच थेट आणि रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या ‘टायगर अभी जिंदा है’ या प्रसिद्ध वक्तव्याची सध्या पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे विरोधी पक्षात अस्वस्थता वाढली असून, अनेकांनी याचे राजकीय संकेत घेतले आहेत.
अमळनेर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिरीष चौधरी कोणत्या भूमिकेत दिसून येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.