रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी लि., जळगावच्या अमळनेर शाखेत भोंगळ कारभार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका जिल्हा परिषद शिक्षिकेला सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून, व्यवस्थापकांनी कर्जाचे चेक तयार केल्यानंतरही ऐनवेळी एका फोन कॉलमुळे कर्ज देण्यास नकार देण्यात आला. या प्रकारामुळे पतपेढीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित शिक्षिकेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
नेमका प्रकार काय घडला?
कळमसरे ता. अमळनेर येथील जिल्हा परिषद शिक्षिका अनिता भाऊराव सूरडकर यांनी पतपेढीत २ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. पतपेढीच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्यांना त्यांचे साक्षीदाराचे कर्ज थकीत असल्याने कर्ज देता येणार नाही, असे सांगितले. श्रीमती सूरडकर यांनी तत्काळ आपल्या साक्षीदाराचे कर्ज पूर्ण भरले आणि कर्जासाठीची अट पूर्ण केली. यावर व्यवस्थापनाने कर्जासाठी हिरवा कंदील दाखवत कर्जाचे चेक तयार केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, चेक तयार झाल्यानंतर कोणाकडून तरी एक फोन कॉल आला आणि व्यवस्थापनाने अनिता सूरडकर यांना कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला.
‘फोन कॅल मुळे नकार आणि टाळाटाळ.
या प्रकारानंतर पतपेढीच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षिका अनिता सूरडकर यांना कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू केली. सर्व नियमानुसार प्रक्रिया पूर्ण होऊनही आणि आवश्यक अट साक्षीदाराचे कर्ज फेडणे पूर्ण करूनही ऐनवेळी केवळ एका फोनमुळे कर्ज नाकारले जाणे, हा पतपेढीच्या मनमानी आणि गैरव्यवस्थापनाचा कळस असल्याचे मत व्यक्त होत आहे. जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या संस्थेतच कर्मचाऱ्यांची अशाप्रकारे अडवणूक होत असेल, तर पतपेढीचा उद्देश सफल होत नसल्याचे दिसून येते. कर्ज मंजूर झाल्यानंतरही ते ऐनवेळी नाकारल्यामुळे शिक्षिकेच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम झाला आहे. तक्रारीची तयारी या भोंगळ कारभाराबद्दल शिक्षिका अनिता सूरडकर यांनी आता जळगाव येथील मुख्य कार्यालयाकडे आणि जिल्हा सहकार विभागाकडे लेखी तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मॅनेजर ज्ञानेश्वर पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.जळगांव जिल्हा सरकारी पतपेढी अमळनेर.