रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातून येऊनही केवळ कष्ट, जिद्द आणि प्रखर देशप्रेमाच्या जोरावर मोठे यश संपादन करणारे रघुनाथ नामदेव मोरे रा. टाकरखेडा, सध्या अमळनेर यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) आपली २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा नुकतीच पूर्ण केली. 3 ऑक्टोबर २०२५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल संपूर्ण अमळनेर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मोरे यांनी सन २००० मध्ये सीआरपीएफमध्ये भरती होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यांची प्रारंभिक प्रशिक्षण प्रक्रिया जम्मू-काश्मीर येथे पार पडली. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग आसाम येथे झाली.
संवेदनशील आणि नक्षलग्रस्त भागांमध्ये सेवा.
आपल्या २५ वर्षांच्या सेवाकाळात मोरे यांनी देशाच्या विविध संवेदनशील आणि आव्हानात्मक भागांमध्ये कर्तव्य बजावले. त्यांनी लेह-लद्दाख सारख्या अत्यंत दुर्गम आणि थंड प्रदेशापासून ते दिल्ली तसेच ओडिशा आणि छत्तीसगड यांसारख्या नक्षलग्रस्त आणि माओवादी प्रभावित भागांमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले.
आदिवासी समाजासाठी प्रेरणा.
गरिबीवर मात करून उच्च सैन्यदलात यशस्वी कारकीर्द घडवल्यामुळे मोरे हे संपूर्ण आदिवासी समाजासाठी एक मोठे प्रेरणास्रोत ठरले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित समारंभात संजू पारधी, भुरा पारधी, धनराज पवार यांच्यासह तालुक्यातील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. रघुनाथ मोरे यांच्या २५ वर्षांच्या समर्पित देशसेवेबद्दल अमळनेर तालुका त्यांचा कायमच अभिमान बाळगेल.