रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुका येथील पातोंडा गावात श्री शिवाजी शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातोंडा येथे बोगस भरती, शालार्थ आयडी घोटाळा, टीईटी प्रमाणपत्र फसवणूक यासारख्या गंभीर अनियमितता उघडकीस आल्या असून, त्यामुळे संपूर्ण अमळनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संस्थेचे विद्यमान चेअरमन विनायक बिरारी यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
घरबसल्या वेतन, बनावट हजेरी : २०१२ पासून सुरू बोगस भरतीचा प्रकार.
प्राप्त माहितीनुसार, २०१२ साली या शाळेत बिना मंजुरी बोगस भरती केली गेली. संस्थेच्या दोन गटांमधील संघर्षात, दोन्ही बाजूंनी आपापल्या नातेवाईक व अपात्र उमेदवारांना बेकायदेशीररित्या नोकऱ्या दिल्या. विशेष म्हणजे, या उमेदवारांना कोणतेही नियुक्ती आदेश किंवा वैध कागदपत्र नसताना, शाळेत हजर दाखवले गेले असून घरबसल्या पगार व वेतन फरकही देण्यात आले.
या प्रकरणात बोगस TET प्रमाणपत्र, शालार्थ आयडी घोटाळा, तसेच पदे नसतानाही पदे निर्माण करून केलेली भरती हे गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत. एक शिक्षक व दोन शिपाई प्रत्यक्षात शाळेत कामावर नसताना, त्यांना नियमित पगार दिल्याचे पुरावे समोर आले आहेत.
शाळेचे राजकारण विद्यार्थ्यांवर परिणामकारक.
शाळेत दोन वेगवेगळ्या संचालक मंडळांमधील संघर्ष आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे शैक्षणिक वातावरण पूर्णतः ढासळले आहे. वेळापत्रक नसणे, शिक्षकांकडून तासिका न घेणे, शिस्तभंगाचे प्रकार यामुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी शेकडो पालकांनी आपली मुले तालुक्याच्या इतर शाळांमध्ये प्रवेशित केली असून, दररोज अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अमळनेरकडे प्रवास करत आहेत.
जनतेची मागणी- संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा.
या प्रकारामुळे गावातील ग्रामस्थ व पालक वर्ग संतप्त झाले असून, शाळेच्या कारभाराची एसआयटीमार्फत सखोल चौकशी, तसेच दोन्ही संचालक मंडळे बरखास्त करून शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, दोषी कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
चेअरमन विनायक बिरारी यांचा आरोप.
“सदर उमेदवारांची कोणतीही भरती प्रक्रिया शाळेने केलेली नाही. त्यांना कोणतेही नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ आदेश उपलब्ध नाहीत. पदे नसताना ही भरती अवैध मार्गाने झाली असून, शासनाची फसवणूक झालेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
— विनायक बिरारी, चेअरमन, श्री शिवाजी शिक्षण मंडळ
प्रशांत बंब व अनंत निकम यांनीही चौकशीची मागणी.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनीही शिक्षणमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनीही पुरावे सादर करून वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असून, कारवाईची मागणी सातत्याने करत आहेत.