रिपोर्टर नूरखान
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील रेशन दुकानदार रामकृष्ण पाटील यांचा भोंगळ आणि नियमबाह्य कारभार समोर आला आहे. शासनाच्या गरीबांसाठी असलेल्या अंत्योदय योजनेचा लाभ अनेक पात्र, नोकरदार व्यक्तींना मिळत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
गावातील एकूण ९२ अंत्योदय लाभार्थ्यांपैकी केवळ ७० जणांनाच नियमित लाभ मिळतो. उर्वरित लाभार्थ्यांमध्ये अनेक नोकरदार आहेत, जे शासन नियमानुसार या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र तरीही त्यांना रेशन मिळते, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण मानले जात आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी पुरवठा निरीक्षकांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे “पुरवठा निरीक्षक आणि रेशन माफियांमध्ये संगनमत आहे का?” असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
गरजवंत गरीब कुटुंबांना अपात्र ठरवून, सत्ताधाऱ्यांच्या ओळखीने अपात्रांना लाभ मिळवून देणे — ही गंभीर बाब असून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.