रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरात नो पार्किंग झोनमध्ये वाहनं लावणे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणे अशा प्रकारांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांमध्ये ३३ वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल २३,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरातील धुळे रस्त्यावर आयडीएफसी बँकेसमोर, बहुगुणे हॉस्पिटलजवळ, बसस्थानक परिसर, तसेच पाचपावली मंदिराजवळ नागरिकांकडून रस्त्यांवर बेधडकपणे वाहने लावण्यात येत होती. यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार वाहतूक पोलीस विलास बागुल, संजय बोरसे, रविंद्र बोरसे आणि विनय पाटील यांनी संयुक्तपणे कारवाई करत अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, अधिक प्रवासी घेऊन जाणारी वाहने आणि रस्त्यावर अडथळा करणारी वाहने यांच्यावर कडक कारवाई केली.
याशिवाय, धुळे रोडवरील पाचपावली देवी मंदिर ते आयडीएफसी बँक पर्यंतच्या मार्गावर रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच नाकाबंदीदरम्यान सीट बेल्ट न घालणाऱ्या चालकांवरही कारवाई करण्यात आली.
एकूण ३३ प्रकरणांतून २३,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही कारवाई नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
शहरातील आर. के. नगर ते दगडी दरवाजा मार्गावर आणि बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी कायमस्वरूपी अवैध पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याप्रकरणी पोलीस व नगरपरिषदेने अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना केली नव्हती. मात्र, नुकत्याच झालेल्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांनी अशी कारवाई नियमितपणे करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.