रिपोर्टर नूरखान
अमळनेर शहर हादरलं; ३६ खोली परिसरात मध्यरात्री भीषण घटना
अमळनेर :- शहरातील शिरूड नाका परिसरात ३६ खोली भागात घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुलानेच आपल्या सख्ख्या वडिलांचा लोखंडी हातोडीने डोक्यात घाव घालून खून केल्याचा प्रकार गुरुवारी (३१ ऑगस्ट) रात्री साडे नऊच्या सुमारास उघडकीस आला. या अमानवी घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव,राजेंद्र दत्तात्रय रासने (वय ६५)
आरोपी:भूषण राजेंद्र रासने (वय ३६)
प्राथमिक माहितीनुसार, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास स्थानिक रहिवासी ऋत्विक भामरे यांना राजेंद्र रासने हे गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, शरद काकळीज व इतर पोलिस कर्मचारी तातडीने दाखल झाले.
पोलिसांनी जखमी राजेंद्र रासने यांना रुग्णालयात हलवले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी स्थानिक लोकांकडून माहिती घेतली असता, मृताचे चिरंजीव भूषण रासने यानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी हातोडीने मारून त्यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
फॉरेन्सिक तपास आणि पुरावे गोळा.
फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी रक्ताचे नमुने, हातोडी व इतर पुरावे जप्त केले आहेत. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेली लोखंडी हातोडी आरोपीने वापरल्याचा संशय आहे.
खुनाचा गुन्हा दाखल.
पोलीस शिपाई अमोल पाटील यांच्या फिर्यादीवरून भूषण रासने याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कुटुंबातील वाद की मानसिक अस्थैर्य?
या खुनामागील नेमका कारणवार तपास सुरू असून, कुटुंबातील वाद, आर्थिक तणाव अथवा मानसिक आजार यामुळे ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. पोलीस आरोपीची मानसिक अवस्था तपासत असून, आवश्यकतेनुसार वैद्यकीय परीक्षण करण्यात येईल.
समाजात संतापाची लाट.
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ‘एकेकाळी ज्यांनी पोराला चालायला शिकवलं, त्याच पित्याचा असा अंत व्हावा, यासारखी वेदना दुसरी नाही,’ अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या घटनेने नात्यांच्या नाजूकतेची आणि मानसिक आरोग्याच्या गंभीरतेची जाणीव पुन्हा एकदा समाजाला करून दिली आहे.