धुळे शहरातील वन विभागाच्या सर्वे नंबर ४६ आणि १३४ मधील जमिनीचा गैरवापर करून, कागदोपत्री रस्त्यांचे काम दाखवून तब्बल ३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संगनमताने हा मोठा घोटाळा केला असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कागदोपत्री रस्ते आणि तिजोरीतील कोटींना गंडा!
शहराच्या विकासाच्या नावाखाली नगाव बारीलगत सरकारी धान्य गोडाऊन ते धुळे-बिलाडी रस्ता जोडण्याच्या नावाखाली १ कोटी ६१ लाख रुपये हडप करण्यात आले. तसेच गावांना जोडण्यासाठी अनावश्यक खडी-मुरुम टाकल्याच्या नावाखाली आणखी दीड कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता मुरुम आणि खडी काढून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे.
महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे काळे कारनामे उघड!
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वन विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बोगस समितीच्या नावाखाली बनावट मंजुरी दाखवली. एवढेच नव्हे, तर सदर रस्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसून, फक्त कागदोपत्री खर्च दाखवून पैसे लाटले आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कायदेशीर कारवाईची मागणी
माजी आमदार अनिल गोटे यांनी वनविभाग तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाच्या निकालांचा दाखला देत तपासाची मागणी करण्यात आली आहे.
धुळेकरांची फसवणूक! – जबाबदार कोण?
या संपूर्ण प्रकारामुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड झाला असून, शहरातील विकासाच्या नावाखाली होत असलेल्या आर्थिक लुटीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. जर हे भ्रष्टाचाराचे सत्र थांबवले नाही, तर शहराचा विकास ठप्प होण्याची शक्यता असून, धुळेकरांचे नुकसान होणार आहे.
महानगरपालिकेतील हे ‘मुरुम घोटाळे’ कोण थांबवणार? प्रशासनातील दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!