रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– अमळनेर व चोपडा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बुधगाव गावात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने वाळू माफियांना मोकळा वावर मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. नदीपात्रात अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उपशामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रात्रीच्या अंधारात सुरू अवैध धंदा.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधगाव येथील नदीपात्रातून (JCB) मशिन्सच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. ही वाळू रात्रीच्या वेळी डंपरद्वारे अमळनेर शहरातून धुळे व शिरपूरकडे पाठवली जाते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण चोपडा तालुक्याच्या तलाठ्याच्या “आशीर्वादाने” सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच, अमळनेर तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
नदीपात्रात खोल खड्डे – पर्यावरणाचे नुकसान.
अवैधरित्या वाळू उपसल्यामुळे नदीपात्रात मोठे खड्डे पडले असून, यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जलसंधारण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धोकादायक असून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष धक्कादायक आहे.

नागरिक त्रस्त – प्रशासन गप्प!
या वाळू उपशामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली असून, डंपरच्या अवाजामुळे रात्री झोपेस त्रास होतोय, असे नागरिक सांगत आहेत. काही समाजसेवकांनी व स्थानिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यासोबतच पर्यावरण विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सुरू आहे.