कासोदा शहरातील साईबाबा मंदिराजवळील भवानी नगर परिसरात एका शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. या छाप्यात १३ हजार ७५० रुपये रोख आणि तीन दुचाकी असा एकूण १ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भवानी नगर परिसरातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली काही इसम पत्त्याचा जुगार खेळत आहेत. माहिती मिळताच पोलीसांनी तत्काळ पथक तयार करून पो.हे.का. नरेंद्र गजरे, पो.ना. प्रदीप पाटील, पो.कॉ. समाधान तोंडे, निलेश गायकवाड, दीपक देसले आणि कुणाल देवरे यांना घटनास्थळी पाठवले.
जुगार अड्डा हे कासोदा शहरापासून लांब शेतात असल्याने पोलिसांनी अंदाजे दीड किलोमीटरचे अंतर आडवाटेने पायी पार केले. पोलिसांनी अचानक धाड टाकली असता काही जुगारी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत पाच जणांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेले जुगारी पुढीलप्रमाणे :
- ईश्वर सुकलाल महाजन
- अक्षय राजेंद्र शिंपी
- प्रविण आत्माराम पाटील
- कैलास निंबा चौधरी
- गणेश प्रकाश मराठे
यांच्याविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (CCTNS क्र. 111/2025).
या कारवाईत पोलिसांनी १३,७५० रुपये रोख आणि अंदाजे १.३० लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी असा एकूण १.४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या संपूर्ण कारवाईत मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांचे मार्गदर्शन लाभले. ही कारवाई सपोनि निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पो.हे.का. राकेश खोंडे करीत आहेत.