रिपोर्टर नूरखान
अमळनेर : राज्य परिवहन महामंडळाचे (एस.टी.) कर्मचारी मागील काही महिन्यांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. काही काळापूर्वी कर्मचाऱ्यांनी संप करून सरकारकडून आपल्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्या वेळी सरकारने त्यांना आश्वासन दिले होते की, सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने तोडगा काढला जाईल. मात्र, अद्यापही अनेक मागण्या रखडलेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एस.टी. महामंडळाचे प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांचे नेते सहभागी होणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे – शासकीय सेवेत विलीनीकरण, नियमित भरती, वेतनवाढ, निवृत्तिवेतन योजना, आणि कामकाजातील सुविधा सुधारणा अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. कर्मचारी संघटनांचा आरोप आहे की, सरकार केवळ आश्वासनांवर काम चालवत असून प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
कामगार संघटनांनी इशारा दिला आहे की, जर या बैठकीतही मागण्या मान्य न झाल्यास, राज्यभरातील एस.टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपाच्या मार्गावर जातील. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.
संपाचा परिणाम नागरिकांवर होतो, विशेषत,ग्रामीण भागातील प्रवाशांवर, जे एस.टी.वर पूर्णपणे अवलंबून आहेत. त्यामुळे ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे, असे मानले जात आहे.
राज्य सरकारने या समस्येकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा एकदा राज्याला एस.टी. संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.