रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने अमळनेर शहरात आयोजित केलेल्या भव्य पक्ष प्रवेश मेळाव्यात ४० ते ५० हून अधिक तरुणांनी प्रवेश करत पक्षाच्या विस्ताराला नवी दिशा दिली. धुळे येथील AIMIM चे जेष्ठ नेते इर्शाद भाई जहागिरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
युवाशक्तीचा मोठा सहभाग.
मेळाव्याच्या सुरुवातीला शहराध्यक्ष सईद शेख आणि सनाउल्ला खान यांच्या हस्ते इर्शाद भाई जहागिरदार यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थितांच्या घोषणाबाजी आणि टाळ्यांच्या गजरात युवकांनी AIMIM मध्ये अधिकृत प्रवेश केला. पक्षप्रवेशाचे प्रतीक म्हणून त्यांच्या हातात पतंग (AIMIM ची निशाणी) देण्यात आले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये सना उल्ला खान, हैदर मिस्री, शाहरुख भाई साहब, जावेद खलीफा, समीर बिंदिया, वाजीद पठान मेवाती, जुनेद पठान मेवाती, शोहेब सैय्यद, फैजान पठान नुरा यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. या पक्षप्रवेशामुळे अमळनेरात पक्षाचा पाया अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी AIMIM सज्ज
यावेळी मार्गदर्शन करताना इर्शाद भाई जहागिरदार यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे संकेत दिले. “राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत असताना, AIMIM देखील मागे राहणार नाही. अमळनेर नगरपालिकेसह जिल्ह्यातील निवडणुकीत आम्ही सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उभे करू,” असे ते म्हणाले.
याप्रसंगी पक्ष नेते शोएब मुल्ला आणि पापा सर यांनी तरुणांना पक्ष मजबूत करण्याचे आवाहन केले. “AIMIM पक्ष हा वंचित आणि दुर्लक्षित समाजाचा आवाज आहे. सर्वांनी संघटित झाल्यास अमळनेरमध्ये पक्षाचा झेंडा नक्कीच उंचावेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नासिर पठाण, माजी नगरसेवक वसीम मंत्री, फैजल हाजी, अफसर शेख, मोहम्मद हुसैन यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. आकीब अली, अल्तमश शेख, अल्ताफ राजा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. शिस्तबद्ध व भव्य आयोजनामुळे AIMIM चा हा पक्ष प्रवेश मेळावा अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.