रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर नगरपालिकेत नुकताच एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम कार्यालयीन वेळेत आणि कार्यालयाच्या परिसरात पार पडल्याची माहिती मिळत असून, यावरून आता संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाने नुकतीच अधिसूचना काढून स्पष्ट केले आहे की, कोणतेही खाजगी कार्यक्रम – जसे की वाढदिवस, फेअरवेल, अथवा तत्सम सेलिब्रेशन – शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत साजरे करण्यास बंदी आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर “महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979” अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
नगरपालिकेत झालेला वाढदिवसाचा कार्यक्रम कार्यालयीन वेळेत झाला असल्याने, त्याविरोधात कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमामुळे काही काळ नियमित कामकाजात अडथळा निर्माण झाला असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांमध्ये मात्र या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या मते, कार्यालयात साध्या स्वरूपात वाढदिवस साजरे करणे ही एक आपुलकीची भावना असते. मात्र शासनाने दिलेल्या आदेशामुळे यावर पूर्णत बंदी आली आहे. तथापि, शासनाने पर्याय म्हणून असे कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर साजरे करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, मुख्याधिकारी काय निर्णय घेतात, याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.