रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या हिंदी अध्यापक मंडळाची विचारसभा अलीकडेच अमळनेर येथे उत्साहात पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली.
स्व. आबासो अनिल अंबर पाटील विद्यालय, मंगरूळ येथील शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांची मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डी.आर. कन्या शाळा हायस्कूल, अमळनेर येथील श्रीमती योगेश्री एम. पाटील यांची उपाध्यक्ष, तर निंभोरा हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण रमण चौधरी यांची सचिव म्हणून निवड झाली.
या वेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक व मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, “हिंदी अध्यापक मंडळ हे केवळ पदाधिकार्यांचे संस्थान नसून एक परिवार आहे. नवे पदाधिकारी मंडळाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा पुढे नेतील, असा विश्वास आहे.”
मावळते अध्यक्ष आशिष शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेत मंडळाच्या एकजुटीवर भर दिला. मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी मंडळाच्या कार्याची विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असलेली उपयोगिता अधोरेखित केली.
सभेत आगामी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक शाळेत हिंदी शिक्षकांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.
या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक पवार, आशिष शिंदे, दिलीप पाटील, ईश्वर महाजन, कविता मनोरे, प्रतिभा जाधव, श्रीमती साबे, प्रदीप चौधरी, सुनील पाटील, प्रशांत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप चौधरी यांनी केले.