रिपोर्टर नूरखान
जळगाव :- केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून विविध वैद्यकीय सेवांचा मोफत लाभ महिलांना या शिबिरात मिळणार आहे. या अभियानासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून डॉ. किरणे सुपे व डॉ. प्राची सुरतवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे होणार आहे. या अभियानाच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शिबिरे घेण्यात येतील. महिलांना स्त्रीरोग तपासणी, इतर आजारांबाबत निदान, उपचार व मार्गदर्शन यासह अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिबिरांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय अमळनेर, उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर व जानवे, अंतुर्ली येथे शिबिरे होतील. १९ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय पारोळा, उपजिल्हा रुग्णालय चोपडा तसेच शेळावे व अडावद येथे, तर २० सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय धरणगाव, उपजिल्हा रुग्णालय जामनेर, पाळधी व नेरी येथे शिबिरे होणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय न्हावी व सावखेडासीम येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. पुढे २२ सप्टेंबर रोजी पाचोरा, यावल ; २३ सप्टेंबर रोजी भडगाव, ग्रामीण रुग्णालय रावेर, कजगाव, लोहारा २४ सप्टेंबर रोजी चाळीसगाव, बोदवड, दहिवद व येवती; २५ सप्टेंबर रोजी एरंडोल, भुसावळ, कासोदा, कठोरा; २६ सप्टेंबर रोजी अमळगाव, सावदा, मारवड व खिरोदा येथे शिबिरे आयोजित आहेत. तसेच २७ सप्टेंबर रोजी अमळगांव, पहुर, शेंदुर्णी व वरखेडी; २८ सप्टेंबर रोजी अमळगांव , वरणगाव, किन्ही व सोनवद; २९ सप्टेंबर रोजी अमळगांव, पाल, चिनावल व तामसवाडी; ३० सप्टेंबर रोजी पिंपळगाव हरे, ग्रामीण रुग्णालय पाल, शिंदाड व पाडळसा येथे शिबिरे होणार आहेत. यानंतर १ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे, ग्रामीण रुग्णालय पाल, वाघळी व वैजापूर येथे, तर समारोप २ ऑक्टोबर २०२५ रोजी महिला रुग्णालय मोहाडी , ग्रामीण रुग्णालय पाल, कानळदरा व निभोरा येथे होणार आहे.
या शिबिरात तपासणी व उपचार तसेच गरज पडल्यास शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उच्चरक्त दाब व मधुमेह तपासणी व उपचार, स्थनाचे,तोंडाचे व गर्भपिशवीचे कर्करोगाची तपासणी व उपचार, रक्तक्षय तपासणी व मार्गदर्शन, क्षयरोग तपासणी व मार्गदर्शन, सिकलसेल आजाराची तपासणी तसेच एसएडी कार्ड वाटप व मार्गदर्शन, संबंधित विषयतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी उदा. स्त्रिरोगतज्ज्ञ, डोळयांची तपासणी, नाक, कान, घसा तपासणी, त्वचा रोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, दंतरोग तपासणी इत्यादी, माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गरोदार माता तपासणी व मार्गदर्शन, लसीकरण शिबीराचे आयोजन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या शिबिरांचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा व स्वतःची आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे.