Dhuliya – Kakar Wahid
सुरत बायपास महामार्गावर मध्यरात्री पायी चालणाऱ्या व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून त्याच्यावर धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला. याप्रकरणी दोन तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, तब्बल २२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. १९ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता अजय आनंदा मोरे हे सुरत बायपास रस्त्यावरुन पायी जात असताना चार जण दोन मोटारसायकलीवर त्यांच्याजवळ आले. लिफ्ट देण्याचा बहाणा करत त्यांना दुचाकीवर बसवले. पुढे हॉटेल चंद्रदिपजवळ पोहोचताच, त्यांनी फिर्यादीला शस्त्राचा धाक दाखवत खिशातील ३ हजार रुपये रोख, विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता फोन पे अॅपचा पिन नंबर मिळवून त्याच्या खात्यातून ७,२०० रुपये उडवले.
या प्रकारानंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे चैतन्य जगदीश पाटील (वय २४) आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे (वय ३२) यांना चितोड गावाजवळील शांतुशा नगरमधून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १० हजार रुपयांचा विवो वाय ११ मोबाईल, २,८७० रुपये रोख आणि १० हजार रुपयांची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी असा एकूण २२ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरित दोन साथीदारांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या चमूकडून करण्यात आली. या मोहिमेत असई. संजय पाटील, असई. सतीश जाधव, पोहेकॉ. संदीप पाटील, मायूस सोनवणे, संतोष हिरे, सुरेश भालेराव, प्रकाश सोनार, पोकॉ. नितीन दिवसे, किशोर पाटील व योगेश जगताप यांनी सहभाग घेतला.