वाहिद काकर, धुळे
धुळे शहरातील सावरकर चौकात बुधवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर हवेत गोळीबार करत सुमारे तीन किलो सोन्याने भरलेली बॅग लुटली. ही धक्कादायक घटना घडली तेव्हा सराफा व्यापारी शहाद्याहून एसटी बसने धुळ्याला येत होते. बस थांबताच, रेकी करणाऱ्या तीन अज्ञात दरोडेखोरांनी मोटारसायकलवर येत व्यापाऱ्याकडील सोन्याची बॅग हिसकावून पळ काढला.
देवपूर पोलिसांचा निष्क्रियपणा उघड
सायंकाळच्या वेळी भर चौकात अशा प्रकारे बंदुकीच्या धाकावर दरोडा पडणे, हे देवपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असला, तरी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिंदोडिया चौकात कोमल शरद शिंदे (मूळ दिल्ली) यांच्यासोबत चेन स्नेचिंगची घटना घडली होती. त्या आपल्या वहिनींसोबत पायी जात असताना बाइकस्वार दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील 10-11 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावली होती. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान सुरवाडे तपास करत आहेत.
पोलिस यंत्रणेची नाकेबंदी फोल
सावरकर चौकातील या सशस्त्र दरोड्याने पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात सतत घडणाऱ्या अशा गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. पोलिसांनी तातडीने प्रभावी कारवाई करून या दरोडेखोरांना अटक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.