रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- नगरपरिषद निवडणुका जवळ येताच अमळनेरमध्ये काही चेहरे अचानक समाजसेवक म्हणून सक्रिय होतांना दिसत आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, स्वच्छता मोहिमा, निवेदने देणे, मदतीचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करणे अशा उपक्रमांद्वारे काही जण आगामी निवडणुकीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, नागरिकांमध्ये याविषयी नाराजीची भावना आहे. “निवडणुकीच्या सहा महिन्यांआधीच दिसणारे हे चेहरे निवडणुका पार पडल्यावर गायब होतात. अशी तात्पुरती समाजसेवा म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट,” असा आरोप अनेक नागरिक करत आहेत.
खरा नगरसेवक कोण?
लोकांच्या मते, खरा नगरसेवक तोच, जो निवडणुकीच्या वेळेपुरता नव्हे, तर संपूर्ण पाच वर्षे लोकांच्या समस्या समजून घेतो, त्यावर उपाय शोधतो आणि समाजात कायमस्वरूपी उपस्थित राहतो. “फोटोसाठी नव्हे, तर खऱ्या कामासाठी जो झटतो, त्यालाच आमचा पाठिंबा,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मतदारांचे आवाहन.या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी ‘सहा महिन्यांच्या समाजसेवकां’पासून सावध राहून, सातत्याने कार्यरत असलेल्या उमेदवारांनाच मत द्यावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक करत आहेत.
लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि शहराचा विकास सुनिश्चित करण्यासाठी, काम करणाऱ्यांना साथ द्यावी, हाच खरा लोकशाहीचा विजय ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.