शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीतील १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, पालकांनी शाळा प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
घटना कशी घडली?
केंद्रीय आश्रमशाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे तात्पुरते स्थलांतर सुलतानपूर आश्रमशाळेत करण्यात आले आहे. येथे इयत्ता सहावी ते आठवीचे १३३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, मुलींचे वसतिगृह तिसऱ्या मजल्यावर आहे.
१ मार्च रोजी सकाळी सव्वा सहा वाजता, खोली क्रमांक C-1 मधील इतर मुली त्यांच्या सामानासाठी परत आल्या असता, उषा लाही-या वसावे (वय १३ वर्षे) ही लोखंडी हुकला ओढणीच्या साहाय्याने लटकलेली आढळून आली. यानंतर शाळा प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
पालकांचा संताप आणि प्रशासनावरील आरोप
घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
पालक आणि नातेवाईकांचा आरोप: “आमच्या मुलीने आत्महत्या केलीच नसावी. एवढ्या टोकाचे पाऊल उचलण्याचे कोणतेही कारण नव्हते.”
उशिराने माहिती दिल्याचा आक्षेप: घटनेची माहिती नऊ वाजेपर्यंतही पालकांना देण्यात आली नव्हती. पोलिस व प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील सुमारे दोन तास उशिरा कळवण्यात आले.
तणावपूर्ण वातावरण; शवविच्छेदन नंदुरबार येथे
पालकांनी घटनास्थळीच आक्रोश करत आश्रमशाळा प्रशासनावर कारवाईची मागणी केली. शवविच्छेदन नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात करावे, अशी मागणी करण्यात आली. काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर, आमदार राजेश पाडवी आणि पोलिसांनी समजूत काढल्यावर मृतदेह नंदुरबारला पाठवण्यात आला.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
विद्यार्थिनीने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही स्पष्टता नाही. घटनेबाबत तर्क-वितर्क लावले जात असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.