रिपोर्टर नूरखान
अमळनेर – तालुक्यातील वावडे गाव परिसरातील पांझरा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपशाचा धुमाकूळ सुरू असून, स्थानिक प्रशासनाचे याकडे सुरू असलेले दुर्लक्ष नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण करत आहे. विशेषत गावाचे तलाठी यांच्यावर दुर्लक्ष वा संगनमताचे आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही आठवड्यांपासून वावडे गावच्या हद्दीतून वाळूने भरलेले ट्रॅक्टर व डंपर दिवसाढवळ्या सहजपणे वाहतूक करताना दिसत आहेत. पांझरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात असून, यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचेही सांगण्यात येते.
“प्रशासनाला याची संपूर्ण माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तलाठी झोपेचे सोंग घेत आहेत की मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या प्रकारामुळे नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूजल पातळीतील घसरण, शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा तुटवडा, तसेच पर्यावरणीय समतोल बिघडण्याचे धोकेही वाढले आहेत.
जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वावडे परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभाग आणि महसूल यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ही बाब प्रशासनासाठी एक गंभीर इशारा मानली जात आहे.