रिपोर्टर नूरखान
मांडळमध्ये वाळूचे ट्रॅक्टर जप्त, पण ‘उतरण’ येथून डंपरने वाहतूक सुरूच; कारवाईचा निकष हफ्त्यावर?
अमळनेर – तालुक्यातील मांडळ गावातील पांझरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून महसूल विभाग केवळ निवडक ठिकाणीच कारवाई करत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. मांडळ येथून वाळू भरून नेत असलेले एक ट्रॅक्टर जप्त करून ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. मात्र याच वेळी अमळनेर शहराजवळील ‘उतरण’ येथून मोठ्या प्रमाणावर डंपरद्वारे वाळूची वाहतूक सुरू असून त्यावर कुठलाही बंदोबस्त किंवा कारवाई नाही.
तलाठ्यांवर हल्ला – तरीही वाळू उपसा सुरूच
काही दिवसांपूर्वी मांडळ परिसरात वाळू माफियांनी तलाठ्यांशी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करून देखील वाळू सुरूच. उलट, पांझरा नदीतून वाळू उपसा निर्भीडपणे सुरू आहे.
हफ्ता दिला तर मोकाट, न दिला तर जप्ती?
मांडळमध्ये ट्रॅक्टर जप्त होत असताना, अमळनेरमध्ये ‘उतरण’ मार्गावरून दररोज डंपरने वाळू वाहतूक सुरू आहे. मात्र महसूल व पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. “जे हप्ते देतात, त्यांची वाहतूक मोकाट सुरू, आणि जे नाकारतात त्यांच्यावर कारवाई” अशी शंका व्यक्त केली जात आहे.
नवीन जिल्हाधिकारी लक्ष घालतील का?
नुकतेच जिल्ह्याला नवीन जिल्हाधिकारी मिळाले आहेत. वाळू उपसावर नियंत्रण, महसूल विभागातील सत्तेचा गैरवापर आणि निवडक कारवायांची चौकशी या बाबींवर ते गांभीर्याने लक्ष देतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.