रिपोर्टर नूरखान
वासरे (ता. अमळनेर) :
तालुक्यातील वासरे गावात लाईन दुरुस्तीसाठी काम सुरू असताना आऊटसोर्सिंग फोर्समधील वायरमन सत्यपाल चौधरी यांना अचानक विजेचा तीव्र शॉक लागल्याची घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात आयसीयू विभागात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच वीज विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कळमसरे येथील ज्युनिअर इंजिनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाईनवर काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सत्यपाल चौधरी हे आऊटसोर्सिंग फोर्समध्ये कार्यरत असून, वीज दुरुस्तीचे काम करत असताना अचानक करंट लागल्यामुळे ते खाली पडले.
सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. ही घटना घडल्यानंतर आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षेचे नियम आणि योग्य साधनसामग्री नसल्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.