लम्पी स्किन डिसीज नियंत्रणासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा पारोळा तालुक्यात दौरा.
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी गुरुवार, दि. २४ जुलै रोजी पारोळा तालुक्यातील लम्पी स्किन डिसीज (LSD) बाधित भागांचा दौरा करत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत लम्पी आजाराबाबत जनजागृती केली व आपल्या जनावरांचे तात्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ. झोड (उपायुक्त, पशुसंवर्धन, जळगाव) तसेच पारोळा गटविकास अधिकारी उपस्थित होते.
लम्पी स्किन डिसीज हा गोवंशांमध्ये आढळणारा विषाणूजन्य आणि अतिशय वेगाने पसरणारा रोग असून, जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्वचेवर गाठी, ताप, सूज, दूध उत्पादनात घट अशी लक्षणे दिसतात.
मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी लसीकरण मोहिमेची प्रगती तपासून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. त्यांनी गावातील पशुधन विकास अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील उपाययोजनांची दिशा ठरवली.
शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे तात्काळ लसीकरण करून घ्या. ,गोठ्यांची स्वच्छता राखा आणि नियमित फवारणी करा. रोगाचे लक्षण दिसताच त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभाग जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. लसीकरण मोहिमेत प्रत्येक शेतकऱ्याने सहभागी होऊन जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.