पुरेसे पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण.
अमळनेर:- तालुक्यातील ढेकूसिम रोड वरील विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या दहा दिवसापासून पाणी सोडलेले नव्हते. दहाव्या दिवशी पाणी पुरवठा केला असता विश्वकर्मा मंदिरासमोरील रेऊनगर भागातील रहिवाशांच्या नळाला पाणी येत नव्हते. असे सातत्याने होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी संतप्त होऊन लक्ष्मीनगर भागातील पाण्याच्या टाकीवर जाऊन ठिय्या आंदोलन केले व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
पावसाळा आहे, पाऊस पडतो आहे, तापी नदीला पुरेसे पाणी आहे. मात्र अमळनेर शहरात अजूनही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
सगळ्यात मोठी झळ चाळीस वर्षांपूर्वीची सर्वात जुनी कॉलनी रेऊ नगर येथील रहिवाशांना बसत आहे. या भागात सातत्याने अवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे येथील रहिवाशांची तारांबळ होत असते. तसेच येथे नोकरदार वर्ग जास्त असल्यामुळे दुपारच्या वेळेस पाणी आल्यास पाणीच मिळत नाही.
संतप्त झालेल्या नागरिकांनी आम्हाला पाणी मिळावे यासाठी नगरपालिकेबद्दल असंतोष व्यक्त केला. या बाबींचा नगरपालिकेने गांभीर्याने विचार करावा अन्यथा रोषास सामोरे जावे लागेल असा इशारा दिला.
या पूर्वी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करूनही कायमस्वरूपी उपाययोजना केली गेली नाही, नगरपालिकेकडून आम्ही जास्त वेळ पाणीपुरवठा करतो असे सांगितले जाते. येथील खूप मोठा परिसर एकाच व्हाॅलवर जोडलेला असल्यामुळे शेवटच्या घरांना पाणी मिळत नाही. गेल्या पंचवीस वर्षापासून चार कॉलनी मिळून एकच व्हाॅल आहे. दरम्यानच्या काळात वस्ती वाढली पण व्हाॅल एकच राहिला त्यामुळे त्यावर ताण पडतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी व नवीन व्हाॅल बसविण्यात यावा अशी मागणी समस्त रहिवाशांची होती.
यात मच्छिंद्र बडगुजर, विलास बिरारी, दिपक ठोके, रवींद्र पाटील, विजय पाटील, तुकाराम धनगर, मिलिंद निकम, प्रमोद साळुंखे, प्रशांत काटकर, गणेश पाटील, सोनल पाटील, प्रतिभा पाटील, पुष्पा बडगुजर, विद्या साळुंखे, आशा ठोके, रेखा पाटील, शितल धनगर यांच्यासह अनेक रहिवाशांचा सहभाग होता.