जळगांव :- महाराष्ट्रच नाही तर देशभरातच पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे देशभरातच मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, राजस्थान, मेघालय या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याकडून शनिवारी महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात तब्बल दोन आठवडे दडी मारून बसलेल्या पावसाचा गेल्या काही दिवसांपासून जोर वाढला आहे. शनिवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने शनिवारी राज्यातील अनेक भागात हाय अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील स्थिती काय..
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १८ आणि १९ ऑगस्टला विदर्भात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी व शुक्रवारी नागपूर शहरात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यात जोरदार पाऊस.
मराठवाड्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटांसह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरीत जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
कोकणातही अतिमुळधार.
कोकणातही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघरला पावसाचा येलो अर्लट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस..
शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.