Igatpuri – Staff Reporter
इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असुन शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वताःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास समोर आले आहे.
याबाबत पिडीतेच्या कुटुंबियाने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घोटी पोलीसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत शुक्रवारी रात्रीच या घटनेतील संशयित मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक केली. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे टाकेद बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात ह्या संतापजनक घटनेने खळबळ माजली आहे.

ह्या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि. ८ रोजी भारत सर्व सेवा संघ संचलित न्यु इंग्लीश स्कूल व ज्युनियर कॉलेज ( कला व विज्ञान ) टाकेद बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी शाळेवर एकच गर्दी केली होती.संबधित आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.तसेच सदर संस्थेची शासन मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी जमलेल्या जमावाला शांत करून संबंधित अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदार संघातील इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कुल शाळेत सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या पीडित विद्यार्थिनीला शुक्रवार दि. ७ रोजी दुपारच्या सुमारास घरकामाच्या नावाखाली वर्गशिक्षक गोरख जोशी याने तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला टाकेद बुद्रुक येथील मुख्याध्यापकाच्या राहात्या घरी नेले. मुख्याध्यापक तुकाराम साबळे याच्या घरातील कुंटुब गावातीलच एका लग्नासाठी साकुर फाटा येथे गेले होते.
या संधीचा फायदा घेऊन तुकाराम साबळे याने पिडीतेवर अत्याचार केला.यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे याने अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. घरी गेल्यानंतर पिडीत मुलीने घडलेला हा प्रकार तिच्या काही मैत्रीनींना सांगितला. पिडीतेच्या मैत्रीनींनी ही घटना पालकांना सांगितली. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आल्यावर व घटनेची शहानिशा झाल्यानंतर पिडीतेच्या आजीने व काही पालकांनी सायंकाळी थेट घोटी पोलीस ठाणे गाठुन घडलेला प्रकार सांगितला. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तक्रार दाखल करून पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कौटे यांनी रात्रीतुन संबंधित मुख्याध्यापक तुकाराम साबळे व शिक्षक जोशी याला अटक केली.
पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर टाकेद बुद्रुक येथील गावकऱ्यांनी कडकडीत बंद ठेवुन गावकऱ्यांनी एकत्र येत घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी करून निषेध व्यक्त केला. या शाळेतील ग्रंथालाचे शिक्षक गायब असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले होते. घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन उपविभागीय पोलिस अधिकारी हरीश खेडकर व घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी दाखल होत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी पोलीस प्रशासनाने गावकऱ्यांशी चर्चा करत योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव थोड्या फार प्रमाणात शांत झाला. या घटनेतील दोन मुख्य आरोपी पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच या शाळेतील संस्था चालकांनी घटनास्थळी दाखल होऊन मुख्याध्यापक व एका शिक्षकाला निलंबित केल्याची माहिती दिली. एवढी मोठी गंभीर घटना घडूनही पंचायतीच्या गट शिक्षण अधिकारी यांनी या ठिकाणी भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.