रिपोर्टर नूरखान
पैलाड येथील हेडावे नाका परिसरात घटना, पोलिसांनी संशयितास अटक केली.
अमळनेर :- पैलाड येथील हेडावे नाका परिसरात रविवारी (दि. २१) मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरू व्यक्तीने ३९ वर्षीय तरुणाची निर्दयपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरले असून, पोलिसांनी केवळ काही तासांतच संशयिताला अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव मुकेश भिका धनगर (वय ३९, रा. पैलाड) असे आहे, तर आरोपीचे नाव निखिल विष्णू उतकर (रा. नाशिक) असे असून तो गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरात वेडसर अवस्थेत फिरत असल्याचे सांगितले जाते.
काही दिवसांपासून शहरात फिरत होता वेडसर अवस्थेत.
निखिल उतकर हा गेल्या काही दिवसांपासून अमळनेर शहरात वेडसर अवस्थेत वावरताना दिसत होता. स्थानिक नागरिक त्याला पाहून घाबरत होते, काही वेळा हुसकावून लावत होते, तर काही जण त्याला अन्न-पाण्याची मदत करत होते. मात्र, त्याचे वर्तन दिवसेंदिवस आक्रमक होत चालल्याचे सांगण्यात येत आहे.
वादातून खून?
रविवारी मध्यरात्री सुमारे १२.३० च्या सुमारास पैलाड येथील हेडावे नाका परिसरात निखिल आणि मुकेश यांच्यात काहीतरी वाद झाल्याचे समजते. वादातूनच निखिलने मुकेश यांच्यावर धारदार अथवा घातक वस्तूने हल्ला करून त्यांचा खून केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
पोलीस तपासात आरोपी गजाआड.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. स्थानिक नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच आरोपी निखिल उतकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरु आहे.
शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात.
मृत मुकेश धनगर यांचे शवविच्छेदन अमळनेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण व हल्ल्याची तीव्रता शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहर हादरले.
या घटनेने संपूर्ण अमळनेर शहरात संतापाची लाट उसळली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच पहाटे अशा प्रकारे एका निर्दोष व्यक्तीचा जीव घेतला गेल्याने नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना आहे. माथेफिरू व्यक्तींच्या वावरावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलिस अधिक तपास करत असून, निखिल उतकर याच्या मानसिक स्थितीचा तपास करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.