रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– अमळनेर येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चादरम्यान माजी खासदार उन्मेष पाटील यांनी विद्यमान खासदार स्मिता वाघ यांच्यावर त्यांच्या सोशल मिडिया पोस्टचा दाखला देत जोरदार टीका केली. या टीकेनंतर महायुती कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाटील यांच्या पुतळ्याचे जोरदार निषेध करून चप्पल मारणे, जाळणे अशा कृती केल्या.
या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेमध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे – “राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही?”
मोर्चाच्या माध्यमातून पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवला – ओल्या दुष्काळाची घोषणा, हेक्टरी ५० हजार रुपये मदत, कर्जमाफी व ७/१२ कोरा करणे, तसेच खरीप पिकांना पीकविमा मंजूर करणे अशा मागण्या त्यांनी मांडल्या. याच मोर्चात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून महिलांविरोधातील वक्तव्याचा आरोप करण्यात येत असून, त्यावरूनच निषेध व्यक्त करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेली नाही. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा नोंदवण्यासाठी आवश्यक असलेले घटक नसल्याने कोणत्याही महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली नाही, असे जाणकार सांगतात.
राजकारणामध्ये टीका आणि प्रतिटिप्पणी ही सामान्य बाब असली, तरी महिला खासदारांविषयी वापरलेली भाषा योग्य होती का?, हा प्रश्नही चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे, मोर्चामधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाल्याचा मुद्दा नागरिक विसरत आहेत का?, असा सवालही काही ठिकाणी ऐकायला मिळतो.
सध्या अमळनेरमध्ये या प्रकरणावरून संतप्त चर्चांना उधाण आले असून, आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.