रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारण तापले असून, विविध गावांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी मानली जाणारी मांडळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
या निवडणुकीत दोन प्रमुख दावेदार आमने-सामने उभे ठाकले आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे विद्यमान सभापती अशोक आधार पाटील आहेत, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) भिकेश पाटील आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत चुरशीची आणि काँटे की टक्कर आहे. अशोक पाटील यांनी विद्यमान सभापती म्हणून केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा विजयाची तयारी केली आहे. त्यांची मजबूत पकड आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
दुसरीकडे, भाजपचे उमेदवार भिकेश पाटील यांनाही लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ते नव्या उत्साहाने मैदानात उतरले आहेत. स्थानिक समस्या आणि विकासाचे मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही एक नवा जोश संचारला आहे.
या निवडणुकीची रणधुमाळी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. व्हॉट्सअप ग्रुप्स आणि फेसबुकवर भावी जिल्हा परिषद सदस्यांच्या नावाने बॅनर, पोस्ट्स आणि रिल्स व्हायरल होत आहेत. काही कार्यकर्ते तर ‘फिक्स जिल्हा परिषद सदस्य’ असे दावे करून प्रतिस्पर्धकांना डिवचत आहेत. यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली आहे.
ही निवडणूक केवळ स्थानिक प्रतिनिधी निवडण्याची नसून, दोन्ही पक्षांच्या तालुका पातळीवरील वर्चस्वाचीही परीक्षा घेणारी ठरणार आहे. मांडळ जिल्हा परिषद गटाचा निकाल हा अमळनेरच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे, अंतिम क्षणी मांडळ गावाचे मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकून कोणाला संधी देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.