पातोंडा ग्रामसभेत महिलांची लक्षणीय उपस्थिती; विकासकामांवर मांडल्या थेट मागण्या.
आठ सदस्यांची दांडी, ग्रामस्थांत नाराजी; कारवाईची मागणी.
अमळनेर (प्रतिनिधी) – पातोंडा ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामसभेला महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. तब्बल ३० ते ४० महिलांनी पहिल्यांदाच ग्रामसभेला उपस्थित राहून गावातील समस्यांवर ठाम भूमिका मांडल्याने ग्रामसभा विशेष लक्षवेधी ठरली.
गावातील गटारींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे खराब झालेले रस्ते, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक शौचालयांची निकृष्ट अवस्था, तसेच कचरा व्यवस्थापनाचा अभाव या गंभीर समस्या महिलांनी ठळकपणे मांडल्या. ग्रामविकास अधिकारी बी.वाय. पाटील यांनी यावर त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
महिलांच्या जागृतीमागे मुरलीधर बिरारी यांचे योगदान
ग्रामसभेपूर्वी दोन दिवस मुरलीधर बिरारी यांनी गावातील महिलांसोबत बैठक घेऊन त्यांना संविधानाने दिलेले हक्क आणि ग्रामसभेचे महत्त्व समजावून सांगितले. या प्रयत्नामुळे महिलांमध्ये जागरुकता निर्माण झाली आणि त्यांनी ग्रामसभेत उत्साहाने भाग घेतला.
उपस्थित पदाधिकारी आणि दांडी मारलेले सदस्य
ग्रामसभेला सरपंच मनीषा मोरे, सदस्य भरत बिरारी, नितीन पारधी, ज्ञानेश्वर सोनवणे व वैशाली पवार उपस्थित होते. मात्र ८ सदस्यांनी ग्रामसभा चुकवली. उपसरपंच दिलीप बिरारी आणि सदस्य कल्पना पवार, संदीपराव पवार, सोपान लोहार, प्रतिभा शिंदे, शीतल पाटील, ज्योती संदानशिव व रेखा पाटील हे अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी झाली.
ग्रामस्थांचे ठाम मत
ग्रामस्थ घनश्याम पाटील, मुरलीधर बिरारी, प्रविण पवार, महेश धुमाळ व दाजभाऊ पारधी यांनी विकासकामांच्या संदर्भात ग्रामविकास अधिकारी व उपस्थित पदाधिकाऱ्यांना कठोर प्रश्न विचारले. मनरेगा अंतर्गत रोजगार संधी, ग्रामसमृद्धी योजनेत गावाचा समावेश, आणि तातडीने दुरुस्तीसाठी हालचाली सुरू करण्याच्या मागण्या यावेळी समोर आल्या.
महिलांचा सहभाग – निर्णय प्रक्रियेला नवे बळ
महिलांनी ज्या प्रकारे स्पष्ट आणि ठामपणे आपले प्रश्न मांडले, त्याचे ग्रामपंचायतीने कौतुक केले. ग्रामस्थांच्या मते, “गावाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा असा सक्रीय सहभाग भविष्यातील निर्णयांना सकारात्मक वळण देईल.”