महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळूचे डंपर दिवसा सर्रास सुरु.
अमळनेर | प्रतिनिधी ( नूरखान )
शहरातील रस्त्यांवर दिवसा ढवळ्या उजेडात वाळूने भरलेले डंपर堂 सर्रास फिरताना दिसत असून, महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. उतराण परिसरातून वाळू भरून ती धुळे दिशेने नेली जात असून, या वाहतुकीसाठी अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठ, चोपडा रोड आदी मार्गांचा वापर सर्रास केला जात आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळूचे भाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे दिवसा–दिवसा वाळूची वाहतूक करून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवण्याचा उद्योग काही ठराविक मंडळींनी सुरु केला आहे. मात्र यामध्ये संबंधित प्रशासनाची संमती आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
महसूल विभागाने नेहमीप्रमाणे झोपेचे सोंग घेतले असून, या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही. नियमांनुसार वाळू वाहतूक रात्रीच्या वेळेत देखील बंधनांखाली असते, मात्र इथे दिवसा मोठ्या डंपरने शहरातून वाळू वाहिली जात आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, प्रशासनाने तत्काळ कारवाई करून वाळू तस्करीला आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
शहरातील कायद्याचा बोजवारा उडवणाऱ्या या अवैध वाहतुकीकडे महसूल विभाग कधी लक्ष देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.