रिपोर्टर नूरखान
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका!
अमळनेर : शहरातील धारमारवड रोडकडे जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या पुलाची अवस्था बिकट झाली असून, या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रशासनाच्या पूर्णतः दुर्लक्षामुळे पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आज सकाळी याच खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतुलन बिघडून तरुण पुलाखाली कोसळला.
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आलेल्या या पुलाचा वापर धारमारवड परिसरासह शहरातील नागरिक दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची डागडुजी झालेली नाही. या पुलावरून जात असताना खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचे संतुलन बिघडले आणि तो थेट पुलाखाली कोसळला आणि पुलाखाली जाऊन पडला. या घटनेनंतर तत्काळ नागरिकांनी धाव घेऊन त्याला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने पुलाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठा धोका.
या मार्गावरून प्रताप महाविद्यालयाचे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी दररोज मोठ्या संख्येने ये-जा करतात. पुलाची सद्यस्थिती पाहता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हा पूल मोठा धोका बनला आहे. भविष्यात शाळेच्या किंवा कॉलेजच्या वेळेत मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिक आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.
जबाबदार कोण?
या पुलाची देखभाल व दुरुस्ती करण्याची मुख्य जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची आहे. मात्र, दोन्ही विभागांनी या गंभीर समस्येकडे पूर्णत दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन, संबंधित प्रशासनाने तातडीने पुलाची डागडुजी करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही गंभीर अपघातास हे दोन्ही विभाग जबाबदार असतील, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.