रिपोर्टर नूरखान
नागरिकांची नगरपरिषदेकडे तीव्र हरकत, बदलाची मागणी.
अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दलित, आदिवासी व मागासवर्गीय वस्त्यांचा अन्य प्रभागात समावेश करून या समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला असून, ही रचना त्वरित बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
ताडेपुरा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे यांनी नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेकडे हरकत पत्र दिले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक ३ मधील साई गजानन नगर, अहिल्यादेवी नगर, हिंदुस्तान बेकरी परिसर व जय भवानी चौक या वस्त्यांचा समावेश चुकीने प्रभाग १२ मध्ये करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे भाग पूर्वीपासून प्रभाग ३ मध्ये असून तेथील रहिवाशांचा सामाजिक आणि भौगोलिक दृष्टिकोनाने या प्रभागाशीच जवळचा संबंध आहे.
याउलट, सिंधी कॉलनी व वर्णेश्वर महादेव परिसर, जे प्रभाग ३ पासून दूर असून कोणतीही सलगता नाही, त्यांना जबरदस्तीने प्रभाग ३ मध्ये टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही रचना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ मधील कलम १०(१)(क) चे उल्लंघन असल्याचे हरकत पत्रात म्हटले आहे. सलगता, अखंडता आणि सामाजिक वास्तवाचा विचारच न करता ही रचना करण्यात आल्याने प्रभागातील दलित व मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व धोक्यात येणार आहे, असे बैसाणे यांनी स्पष्ट केले.
या भागात आधीच पाणी, रस्ते, गटार आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे चुकीची प्रभाग रचना झाल्यास विकासाच्या दृष्टीने समाज आणखी मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या.
साई गजानन नगर, अहिल्यादेवी नगर, हिंदुस्तान बेकरी परिसर व जय भवानी चौक यांचा पुन्हा प्रभाग ३ मध्ये समावेश करावा.
सिंधी कॉलनी व वर्णेश्वर महादेव परिसर प्रभाग ३ मधून वगळावा.
हरकत पत्र निवडणूक अधिकारी जगदीश चौधरी व शांताराम पाटील यांनी स्वीकारले असून, यावर लवकरच निर्णय होणार आहे. दरम्यान, मागासवर्गीय समाजाचे लक्ष आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.