रिपोर्टर नूरखान
अमळनेर:- १८ ऑगस्ट — अमळनेर नगर परिषदेने शहराची नवीन प्रभागरचना जाहीर केली असून यामध्ये यंदा एक प्रभाग वाढवून एकूण प्रभागांची संख्या १८ करण्यात आली आहे. मात्र, या नव्या प्रारूपात प्रभाग क्रमांक १२ संदर्भात गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कंखरे यांनी प्रभाग १२ च्या रचनेवर तक्रार दाखल करत ती नियमबाह्य आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत
खालील मुद्दे मांडले.
नैसर्गिक सीमा विचारात न घेता रचना
अनुसूचित जाती-जमातींचे विभाजन
ताडेपुरा वस्तीचे कृत्रिम दोन भाग करून वेगवेगळ्या प्रभागात समावेश
भौगोलिक सलगतेचा अभाव आणि आयोगाच्या सूचनांचा भंग.
प्रभाग १२ मध्ये नदी व राजमार्गासारखे अडथळे असूनही त्या भागांमध्ये कृत्रिमरित्या सलगता दर्शवून वस्तीचा समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यासंदर्भात नगर परिषदेकडे लेखी हरकत दाखल करण्यात आली असून, यावेळी चंद्रकांत कंखरे यांच्यासोबत पंकज चौधरी, पंकज भोई, राहुल कंजर, विपुल पाटील, विलास कंखरे, गोलू लांडगे, कुंदन पाटील, पारस धाप, राहुल पाटील, अक्षय अग्रवाल आदी नागरिक उपस्थित होते.
सदर प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेतं याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.