अमळनेर, दि. २९ ऑगस्ट (प्रतिनिधी नूरखान )
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात धुळे येथील प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.
‘मराठी साहित्याचे सामाजिक योगदान’ या विषयावर बोलताना डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “आपल्या मातीत काय लिहिलं गेलं ते वाचणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. साहित्यातून मिळणारे अनुभव, संस्कार आणि विचार समाजाला दिशा देतात.”
त्यांनी आपल्या भाषणात साने गुरुजी आणि अमळनेरचे संबंध, प्राचीन ते आधुनिक मराठी साहित्यातील प्रवास, साहित्याचा सामाजिक उपयोग तसेच खानदेशातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यावरही सखोल भाष्य केले. त्यांच्या सखोल आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयक उत्सुकता व प्रेरणा निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच. डी. जाधव यांनी “साहित्य हे मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम करते. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती वाढवून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सागर सैंदाणे यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. तुषार पाटील, आणि विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.