रिपोर्टर नूरखान
अमळनेर – शहरातील धार मारवड रोडकडे जाणाऱ्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याकडे प्रशासन पूर्णत, दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आलेला हा पूल नागरिकांकडून दिवस-रात्र वापरला जात आहे. मात्र सध्या या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
आज सकाळी या पुलावरून जात असताना एका तरुणाचा अपघात झाला. पुलावरील खड्ड्यांमुळे त्याचे संतुलन बिघडून तो थेट पुलाखाली कोसळला. त्याला तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, या मार्गावरून प्रताप महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा दररोज मोठ्या प्रमाणात येजा करतात. अशा अवस्थेतील पूल विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका बनला आहे.
पुलाची देखभाल आणि डागडुजी करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे प्रशासनाची असून, त्यांनी याकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.