रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या प्रसिद्ध पारस गोल्ड ज्वेलर्स या नांकित दुकानाने अंदाजे ८ फूट रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले असून, या अतिक्रमणामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून हे अतिक्रमण सुरू असूनही, नगर पालिका प्रशासनाने याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, पारस गोल्ड या दुकानासमोर सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर पार्किंग करण्यात आले आहे. मोठे दुकान असूनही पार्किंगची सोय नसल्याने दुकानदार रस्त्यावरच वाहनांची रचना करत आहेत. परिणामी, या भागात सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. पादचारी आणि ग्राहक दोघेही त्रस्त आहेत.
सर्वसामान्य हातगाडीधारक, फेरीवाले यांच्यावर नगर पालिका तात्काळ अतिक्रमणाची कारवाई करते. परंतु पैशाच्या जोरावर मोठे व्यापारी अतिक्रमण करत असल्याचे दिसून येते, असा आरोप आता शहरातील जनतेकडून होत आहे.
नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या बाबतीत काहीही कारवाई केली नसल्याने, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. “गरीबांच्या हातगाड्या हटवता, पण मोठ्या दुकानदारांचे अतिक्रमण सोडून देता?” असा प्रश्न आता निर्माण होत आहे. पारस गोल्ड अतिक्रमण बाजारपेठेत जोरात चर्चिला जात आहे.
शहरातील काही व्यापाऱ्यांनी देखील या अन्यायकारक प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील जागरूक नागरिकांनी ही बाब नगर पालिकेकडे लेखी स्वरूपात मांडण्याची तयारी दर्शवली असून, लवकरच जिल्हा अधिकारी यांच्याकडे यावर आवाज उठवला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
नगर पालिका कारवाई करणार का?
आता पाहावे लागेल की, अमळनेर नगर पालिका प्रशासन पारस गोल्डसारख्या नांकित दुकानाच्या अतिक्रमणावर कोणती कारवाई करते, की पुन्हा एकदा मोठ्या नावापुढे झुकते.