रिपोर्टर नूरखान
तहसीलदार रजेवर, तलाठ्यांचा मुजोरपणा शिगेला; उपविभागीय अधिकाऱ्यांचे लक्ष अत्यंत आवश्यक.
अमळनेर : – अमळनेर तालुक्यातील मांडळ, वावडे, जवखेडा, कलंबू परिसरात पांझरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, यामध्ये संबंधित गावांतील तलाठ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. तहसीलदार रजेवर असतानाच तलाठ्यांनी मोकळा श्वास घेत वाळू माफियांसोबत संगनमत करून नैसर्गिक संपत्तीची उघड लूट सुरू केली आहे, अशी जोरदार चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पांझरा नदीच्या पात्रात रात्रंदिवस जेसीबी व डंपरच्या साहाय्याने वाळू काढली जात आहे. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना, हे काम खुलेआम सुरू आहे. वाळू उपसा झाल्यानंतर मांडळ गावातून वावडे, जवखेडा, कलंबू मार्गे वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे.
तलाठ्यांचा सहभाग?
या अवैध व्यवहारात मांडळ व वावडे येथील तलाठ्यांचा सहभाग असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. एका स्थानिक हॉटेलमध्ये तलाठ्यांनी वाळू माफियांकडून चिरीमिरी घेतल्याचे स्पष्ट झाले असून, त्यानंतर अमळनेर शहरातील एका हॉटेलमध्ये दारू पार्टी करत ‘फुल मजा’ केल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गप्प?
तहसीलदार रजेवर असल्याचा गैरफायदा घेत तलाठ्यांनी जबाबदारी झुगारल्याचे स्पष्ट होते आहे. परंतु अधिक धक्कादायक बाब म्हणजे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे या वाळू माफियांना खुलेआम लूट सुरू ठेवता येत आहे.
ग्रामस्थ त्रस्त, पर्यावरण धोक्यात.
या सर्व परिस्थितीमुळे मांडळ व आजूबाजूच्या गावातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. नदी पात्रातील जैवविविधता धोक्यात आली असून, अवजड वाहनांमुळे रस्ते खराब झाले आहेत आणि अपघातांचा धोका वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप आहे.
जनतेचे मागणी ..
“या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित तलाठ्यांना तात्काळ निलंबित करावे, आणि वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांनी तातडीने या प्रकरणाकडे लक्ष न दिल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.