रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- राष्ट्रीय समाजकार्य पंधरवाडा २०२५ च्या निमित्ताने नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या वतीने महाविद्यालयातील एम.एस.डब्ल्यू. (MSW) द्वितीय वर्ष तसेच बी.एस.डब्ल्यू. (BSW) तृतीय वर्ष या वर्गांतील विद्यार्थ्यांसाठी गांधी तीर्थ, जळगाव येथे एक दिवसीय अभिमुखता व अध्ययन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
या अभ्यास दौऱ्याचे आयोजन NAPSWI (National Association of Professional Social Work in India) आणि MASWE (Maharashtra Association of Social Work Educators) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या दौऱ्यात एकूण ६० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
गांधी तीर्थ हे जळगाव येथील जैन हिल्स परिसरात वसलेले एक राष्ट्रीय दर्जाचे गांधी विचार केंद्र आहे. यामध्ये गांधी संग्रहालय, वाचनालय, संशोधन केंद्र, आणि शैक्षणिक अभ्यास सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनकार्याचा सखोल अभ्यास, विचारमंथन आणि मूल्यांवर आधारित प्रशिक्षण दिले जाते.
विद्यार्थ्यांनी दौऱ्यादरम्यान गांधी संग्रहालयास भेट देऊन महात्मा गांधींच्या जीवनप्रवास, स्वातंत्र्य चळवळीतले योगदान, तसेच त्यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान याचा अनुभव घेतला. त्यानंतर वाचनालय आणि संशोधन केंद्रामध्ये गांधीवादी साहित्य व संशोधनप्रवण माहितीचा अभ्यास करण्यात आला.
दौऱ्यादरम्यान गांधीवादी तत्त्वज्ञान, सामाजिक कार्य मूल्ये, शांतता निर्मिती, ग्रामीण विकास आणि शाश्वतता या विषयांवर विशेष चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभाग घेतला व गांधीविचारांच्या सामाजिक कार्यातील उपयुक्ततेवर सविस्तर चर्चा झाली.
या शैक्षणिक अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या सैद्धांतिक ज्ञानासह व्यवहार्य आकलनात वाढ झाली असून गांधीवादी मूल्ये वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात कशी अंगीकारावी याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन मिळाले.
या दौऱ्यात प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. भरत खंडागळे, प्रा. धनराज ढगे, आणि डॉ. अस्मिता सर्वैया हे प्राध्यापक मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजकार्य शिक्षणात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नाही, तर अशा प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यांमुळे मूल्याधिष्ठित समाजकार्याची जाणीव विद्यार्थ्यांना होते.”
या अभ्यासदौऱ्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातील सामाजिक कार्यासाठी दिशा देणारा ठरल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी नमूद केले.