शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान शहरातील अनेक घरात पाणी शिरले.
नवापूर :- आज दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने नवापूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. तब्बल दोन तासांच्या जोरदार पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला.
विशेषतः उमराण परिसरातील उमराण–नवापूर रस्त्यावर नाल्यात पावसाचे पुराचे पाणी आल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावरील वाहन वाहतूक बंद केली होती. जवळपास दीड तासानंतर पाण्याचा प्रवाह ओसरल्यावरच वाहतूक सुरू करण्यात आली.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी वर्गावर गंभीर संकट ओढवले आहे. भात, ऊस, मका व कपाशी या पिकांवर पुराचे पाणी साचल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शहरातील घरात पाणी शिरले.
नवापूर शहरातील इस्लामपूरा, प्रभाकर कॉलनी, देवलफळी भागात पावसाचे पाणी घरात घुसले. इस्लामपूरा भागातील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळील अंडरपास मधून पाणी न गेल्याने पुराचे पाणी परिसरात पसरले. घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, लाईटसह धान्य व इतर संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शहरातील पाणी काढण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील स्वतः मैदानात उतरले होते. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाण्यात उतरून नागरिकांना मदत केली.
प्रशासन सतर्क.
अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील पुरग्रस्त भागात मदतकार्य सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी-नाल्यांच्या प्रवाहात जाऊ नये व अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, अशा सूचना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी दिल्या आहेत.