रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील मध्यवस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिक राजेश प्रभाकर पवार यांनी नगरपरिषदेच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, टीपी नंबर 220/3/2 वरील त्याच्या कुटुंबाच्या मिळकतीशेजारील टीपी नंबर 220/4 वर बलराम कोटमल फतवाणी यांच्याकडून सुमारे १,५५० चौ.फु. अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने २०१४ सालीच नोटीस बजावली असून, न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू आहे. न्यायालयाने मनाई आदेश दिला असतानाही संबंधित बांधकाम आजही अपूर्ण अवस्थेत तसाच आहे.
तसेच, पवार हे आययुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकान क्र. १ मध्ये फोटोग्राफी व्यवसाय करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार शेजारील दुकानधारक नारायण मोतीसिंग राजपुरोहित यांनी लोखंडी जिना व शेगड्या लावून फूटपाथवर अतिक्रमण केले आहे, तर शिवशक्ती पावभाजी गाडीवाल्यानेदेखील फूटपाथ अडवला आहे. यामुळे ग्राहक व नागरिकांना ये-जा करण्यात मोठा त्रास होत आहे.
या सर्व तक्रारी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी स्वरूपात सादर करूनही केवळ नोटिसा बजावण्यात आल्या, पण कोणतीही ठोस कारवाई अद्याप झाली नाही.
राजेश पवार यांनी नगरपरिषदेच्या अशा निष्क्रिय आणि पक्षपाती वर्तनाविरोधात आवाज उठवून आता नगरपरिषद अमळनेरच्या आवारात आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी याबाबत परवानगीसाठी अधिकृत अर्ज सादर केला असून, योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे.
या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.