रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षं झाली, पण अजूनही काही वस्ती अशी आहेत जिथे मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अमळनेर तालुक्यातील ढेकू बु तांडा या वस्तीतील बंजारा समाज आजही स्मशानभूमीशिवाय आपले अंत्यसंस्कार करत आहे.
५ सप्टेंबर रोजी गावातील रामसिंग झिपा राठोड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, ढेकू बु तांड्यात स्मशानभूमी नसल्याने भर पावसात त्यांच्या प्रेतावर ताटपत्री बांधून अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना केवळ दुःखद नाही तर शासन व लोकप्रतिनिधींना सवाल करणारी आहे.
या तांड्यात ५० ते ६० कुटुंबांची वस्ती असून गेली ६०-७० वर्षांपासून बंजारा समाज येथे राहत आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या मालकीची गावठाण जागा या समाजासाठी स्मशानभूमी म्हणून वापरली जात होती. मात्र १९९३ साली ती जागा वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर वनविभागाने स्मशानभूमी बांधण्यास मज्जाव केला.
बंजारा समाजाची परंपरा सांगते की, जिथे पूर्वजांचे अंत्यसंस्कार झाले, तिथेच पुढील पिढीचेही व्हावेत, त्यामुळे अन्य जागी अंत्यसंस्कार करणं त्यांच्या संस्कृतीला धरून नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात तारेवरची कसरत करत, उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात.
ग्रामस्थांची मागणी.
वनविभागाकडून मूळ जागा परत मिळावी.
शासकीय पातळीवर स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करून सुविधा उभाराव्यात.
लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालावं.
“निवडणुका आल्या की आम्ही दिसतो, पण गरज पडली की आम्ही हरवतो का?” – ढेकू बु तांडा ग्रामस्थ. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. सुरू हा केवळ जागेचा प्रश्न नाही, तर अस्मितेचा आणि संस्कृतीच्या सन्मानाचा प्रश्न आहे.