रिपोर्टर नूरखान
अमळनेर:-शहरातील डीडी नगरच्या मागील बाजूस नवीन प्लॉट बांधले जात आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नवीन घर बांधण्याचे काम सुरू असून, हजारो ब्रास मुरुम तिथे उतरवण्यात आला आहे. या मुरुमाचे स्रोत नेमके काय आहेत, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनुसार, “इतक्या मोठ्या प्रमाणावर मुरुम कुठून आला? त्या मुरुमाच्या वाहतुकीसाठी महसूल विभागाची परवानगी होती का?” अशी अनेक शंका निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाने अमळनेर शहरातील बेकायदेशीर मुरुम वाहतूक करणारे काही डंपर जप्त केले होते. त्यामुळेच डीडी नगर परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर मुरुम उतरवला गेला असताना, महसूल विभाग गप्प का आहे? असा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
बिल्डर आणि महसूल अधिकाऱ्यांमध्ये संगनमत?
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, संबंधित बिल्डर आणि महसूल प्रशासन यांच्यात काही प्रकारचं संगनमत असून, परवानगीविना मुरुम वाहतूक केली जात आहे. एवढंच नव्हे, तर “चिरीमिरी” देऊन हा प्रकार खपवण्यात येत आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीची अपेक्षा.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून, मुरुमाचे स्रोत व वाहतुकीबाबतचे सर्व दस्तऐवज तपासून कोणतीही अनियमितता असल्यास दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.