Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiजळगावकरांसाठी पुण्याच्या प्रवासाची जलद व आधुनिक सुविधा; नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्र्यांच्या...

जळगावकरांसाठी पुण्याच्या प्रवासाची जलद व आधुनिक सुविधा; नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

भुसावळ आणि जळगाव रेल्वेस्टेशनवर वंदे भारत गाडीचे जंगी स्वागत.

जळगाव :- जळगावसह विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना पुण्याच्या प्रवासासाठी जलद, आरामदायी आणि आधुनिक सुविधा मिळण्याचा ऐतिहासिक क्षण आज आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या गाडीच्या मार्गात भुसावळ आणि जळगाव या दोन्ही स्थानकांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना याचा थेट लाभ होणार आहे.

भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर गाडीचे जंगी स्वागत करण्यात आले. भुसावळ येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीला शुभेच्छा दिल्या. जळगाव स्थानकावर खासदार श्री. उज्वल निकम, खासदार श्रीमती स्मिता वाघ आणि आमदार सुरेश (राजीव मामा) भोळे यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा देण्यात आला. या सोयीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी एकाच वेळी बेंगळुरू–बेळगाव आणि कटरा–अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचाही शुभारंभ केला.

नागपूर (अजनी)–पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवासाचे अंतर जवळपास 12 तासात पूर्ण होईल. गाडी वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड स्थानकांवर थांबत पुण्यास पोहोचेल. स्थानके फुलांच्या तोरणांनी, पताकांनी सजवण्यात आली होती आणि प्रवासी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी स्थानिक शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण आनंदमय झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नगर–पुणे रेल्वे मार्ग निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्याचा नगर–दौंडमार्गे होणारा 100 ते 125 किमीचा अतिरिक्त फेरा टाळण्यासाठी नगर–पुणे थेट मार्ग विकसित करण्याचे नियोजन सुरू असून, छत्रपती संभाजीनगर–अहमदनगर–पुणे औद्योगिक पट्टा वेगाने विकसित करण्यासाठी या प्रकल्पाचा विचार ‘राईट ऑफ वे’ अंतर्गत करता येईल, असे ते म्हणाले.
पुणे–अजनी वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत असून, ट्रेन क्रमांक 26101 पुणे स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6.25 वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी येथे पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक 26102 अजनी स्टेशनवरून दर आठवड्यात सहा दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 9.50 वाजता पुण्यास पोहोचेल. गाडीत 1 एक्झिक्युटिव्ह चेअर कार (EC) आणि 7 चेअर कार (CC) असून, सर्व डबे वातानुकूलित, स्वयंचलित तापमान नियंत्रणयुक्त, एर्गोनॉमिक आसन व्यवस्था, मोठ्या पॅनोरामिक खिडक्या, बायो–व्हॅक्यूम शौचालये, स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे, सीसीटीव्ही निगराणी, आपत्कालीन संवाद प्रणाली व ड्युअल सस्पेन्शनसह सुसज्ज आहेत.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार झालेली ही वंदे भारत ट्रेन भारताच्या प्रगत तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, ‘एक भारत जोडलेला भारत’ या संकल्पनेचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ ठरत आहे. या सेवेमुळे धार्मिक स्थळे, व्यापार, पर्यटन व रोजगाराच्या संधींना चालना मिळून विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular