रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या अनुषंगाने “सेवा पंधरवाडा – २०२५” हा उपक्रम दि. १७ सप्टेंबर २०२५ (मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस) ते दि. ०२ ऑक्टोबर २०२५ (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत महसूल विभागामार्फत राज्यभर राबविण्यात येणार आहे. याचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक बनविणे हा आहे.
तालुका अमळनेर येथे या उपक्रमाच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठक मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.
या अभियानांतर्गत पूर्वी राबविण्यात आलेले विविध उपक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात, युद्धपातळीवर मोहीम स्वरूपात राबवले जाणार आहेत. पंधरवाड्यानंतरही हे उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत अधिक सुसूत्रता व परिणामकारकता येईल.