रिपोर्टर नूरखान
अमळनेर :– अमळनेर न्यायालय परिसरातून चोरीला गेलेली मोटारसायकल केवळ चार तासांत शोधून काढत आरोपीला अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. ही धडक कारवाई करून पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेचे उदाहरण सादर केले.
जयपाल इंदरसिंग राजपूत रा. गणपूर, ता. चोपडा हे दिनांक ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० ते १.३० दरम्यान न्यायालयात कामासाठी आले होते. त्यांनी आपली एचएफ डीलक्स मोटारसायकल क्र. MH 19 DP 4541 न्यायालय गेटजवळ पार्किंगमध्ये लावली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने ती मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि समाधान गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोहेकॉ मिलिंद सोनार, पो. कॉ. विनोद संनदनशिव व उदय बोरसे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केवळ चार तासांत आरोपी धनंजय रवींद्र पाटील रा. विद्यानगरी, देवपूर, धुळे याला चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह अटक केली. आरोपी अमळनेर न्यायालयात एका कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात तारखेसाठी आला होता. त्यानंतर मास्टर कीच्या सहाय्याने मोटारसायकलचे लॉक उघडून ती चोरून नेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या तपासात उघड झाले की, यापूर्वीही याच आरोपीने धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बुलेट मोटरसायकल चोरी केली होती, आणि त्या प्रकरणातही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली घरे आणि परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी यावेळी केले. त्यांनी पुढे सांगितले की, मौल्यवान वस्तू, रोख रक्कम घरी ठेवू नये, तसेच शक्य असल्यास घर आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ मिलिंद सोनार हे करीत आहेत.