शिरपूर @ वाहिद काकर: दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी शिरपूर तालुक्यातील पोलिसांनी एक मोठी कारवाई करून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन व्यक्ती हिरो एच.एफ. डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १८ ए.सी. ००१३) वर उमर्टी (मध्य प्रदेश) येथून लाकड्या हनुमान-सुळेमार्गे शिरपूरकडे गावठी कट्टा (पिस्टल) व जिवंत काडतुसे घेऊन येत होते. या माहितीच्या आधारावर, पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील दहिवद फाट्याजवळील हॉटेल गुलमोहरजवळ सापळा रचला. काही वेळात वर्णनानुसार मोटारसायकल येताना दिसली. पोलिसांनी इशारा करताच चालकाने वेग वाढवून मोटारसायकल पळवून नेली. पाठलाग करून पोलिसांनी एका आरोपीला पकडले, तर दुसरा जंगलात पळून गेला.
अटक केलेल्या आरोपीचे नाव सैजाद नबी पिंजारी (वय २३, रा. मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर) असे आहे. त्याने पळून गेलेल्या साथीदाराचे नाव गुड्डू नुरोद्दीन चौधरी (रा. मदिना मोहल्ला, कुंभारटेक, शिरपूर) असे सांगितले. पोलिसांनी पिंजारीच्या अंगझडतीत व मोटारसायकलच्या झडतीत ३०,००० रुपये किमतीची एक गावठी पिस्टल, ४,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आणि ५०,००० रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ८४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सैजाद पिंजारीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार करीत आहेत.
ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार, पोलीस हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, योगेश मोरे, भूषण पाटील, सुनील पवार आणि दिनकर पवार यांच्या पथकाने केली.