रिपोर्टर नूरखान
जळगांव :- गणेशोत्सवाच्या पावन निमित्ताने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक आगळीवेगळी संकल्पना राबवली. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांच्या मुलांना विशेष निमंत्रण देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत वेळ घालवला, संवाद साधला आणि अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.
या छोट्या मुलांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, स्वप्ने आणि भविष्याच्या आकांक्षा जाणून घेतल्या. त्यांच्या डोळ्यांत झळकणारी चमक, काहीतरी मोठं करण्याची इच्छा आणि जिद्द पाहून उपस्थित सर्वांनाच भारावून टाकलं.
आयुष प्रसाद यांनी मनोभावे अशी प्रार्थना व्यक्त केली – “या मुलांनी सर्व अडथळे पार करत एक दिवस या खुर्चीत बसावं, समाजाचं नेतृत्व करावं – हीच खरी गणेश आराधना!”

हा अनोखा उपक्रम हा फक्त गणेशोत्सव नव्हे, तर आशेचा, समानतेचा आणि स्वप्नांना बळ देणारा सण ठरला. प्रत्येक मुलाला मोठी स्वप्नं पाहण्याचा आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा हक्क आहे, ही आठवण या उपक्रमाने आपल्या मनात अजून घट्ट रुजवली.