रिपोर्टर नूरखान
अमळनेर:- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणारे प्रताप हायस्कूल, अमळनेर येथील उपशिक्षक किरण प्रकाश सनेर यांनी एक मोठे शैक्षणिक यश संपादन केले आहे. त्यांनी जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या SET (State Eligibility Test) परीक्षेत रसायनशास्त्र विषयात ३०० पैकी १४७ गुण मिळवत प्राध्यापक पदासाठी पात्रता प्राप्त केली आहे.
SET परीक्षा ही राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा असून, दरवर्षी हजारो उमेदवार या परीक्षेत सहभागी होतात. अशा स्पर्धात्मक वातावरणात सनेर यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सखोल विषयज्ञान, अभ्यासातील सातत्य, आणि शिक्षणाबद्दलची निष्ठा यांचे प्रतीक आहे.
किरण सनेर हे गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे मार्गदर्शन करत असून, त्यांच्या अध्यापनशैलीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी परीक्षांमध्ये यश मिळवतात, हे त्यांच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल.
परीक्षा यशानंतर प्रतिक्रिया देताना सनेर म्हणाले, “हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या कुटुंबियांचे, सहकारी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आहे. पुढे संशोधन आणि उच्च शिक्षण क्षेत्रात कार्य करताना समाजासाठी काहीतरी सकारात्मक देण्याचा माझा मानस आहे.”
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षकवृंद, पालक, माजी विद्यार्थी तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमळनेर सारख्या ग्रामीण भागातून येऊन उच्च दर्जाच्या पात्रता परीक्षा यशस्वीरीत्या पार पाडणाऱ्या सनेर यांचे हे यश नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, यात शंका नाही.