रिपोर्टर नूरखान
ग्रामस्थांनी व्यक्त केला आभार; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ठरले चर्चेचा विषय.
अमळनेर -: तालुक्यातील कळंबू ते मुडी या महत्त्वाच्या रस्त्यावर वाढलेली काटेरी झुडपे, गवत आणि वळणांवर आलेली झाडांमुळे वाहनचालकांसह शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची तातडीने दखल घेत भिकेश पाटील यांनी पुढाकार घेतला असून, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे, झुडपे आणि गवत हटवून वाहतूक सुरळीत केली आहे.
या रस्त्याने कळंबू, मुडी, बोदर्डे आणि मांडळ लोन ही चार गावे जोडली जातात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील असलेल्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या होत्या, तर गवतामुळे वळणं नीट दिसत नव्हती. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही विभागाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक ग्रामस्थांत नाराजी होती. कळंबू गावातील संजू कोळी यांनी ही माहिती थेट भिकेश पाटील यांना दिली. नागरिकांच्या विनंतीची तातडीने दखल घेत भिकेश पाटील यांनी कोणताही विलंब न करता जेसीबीच्या मदतीने संपूर्ण रस्ता मोकळा करून घेतला.
या कामामुळे वाहनचालकांचा प्रवास आता सुकर व सुरक्षित झाला आहे. विशेषतः बैलगाड्या आणि दुचाकीने शेतीत जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी भिकेश पाटील यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले आहे.